पुरंदर तालुक्यात केबल व विद्युत मोटार चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी भयभीत, कठोर कारवाईची मागणी
स्टारयुग लाईव्ह : राजुरी / विक्रम यादव
पुरंदर तालुक्यातील राजुरी परिसरात विहिरी व बोरवेलमधील विद्युत मोटारी, वीज केबल आणि अन्य विद्युत साहित्य चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच अपुऱ्या पावसामुळे पेरणी व पिकांचे नियोजन विस्कळीत झाले असून, त्यातच चोरट्यांच्या वाढत्या धाडसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
राजुरी गावासह परिसरातील शेतांमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे सक्रिय होत असून, विहिरी व बोरवेलमधील महागड्या विद्युत मोटारी, केबल आणि इतर साहित्य चोरून नेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसत असून, पुन्हा नवीन साहित्य बसविण्यासाठी मोठा खर्च करावा लागत आहे. परिणामी सिंचन व्यवस्थाही विस्कळीत होत असून पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राजुरीजवळील यादव वस्ती येथील शेतकरी विक्रम मारुती यादव यांच्या शेतातील वीज केबल चोरीची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करावा व चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही महिन्यांपासून अशा चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक शेतकरी तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने काही घटना नोंदीतही येत नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे धाडस आणखी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे रात्रीची गस्त वाढविणे, संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवणे, वारंवार चोरी होणाऱ्या भागात विशेष पथके तैनात करणे तसेच विद्युत मोटार व केबल चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
1) राजुरी परिसरात रात्रीची पोलीस गस्त तातडीने वाढवावी.
विद्युत मोटार व केबल चोरी करणाऱ्या टोळ्यांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे.
2) वारंवार चोरी होणाऱ्या शेतमळ्यांमध्ये गुप्त पाहणी व गस्त वाढवावी.
3) चोरीस जबाबदार आरोपींना तातडीने अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात.
4) सततच्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, वेळेत कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही काही शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे जेजुरी पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी एकमुखी मागणी राजुरी परिसरातील शेतकरी करीत आहेत.
