*शासन निर्णयानुसार फिक्स मानधनासाठी राज्यभरात ग्रामरोजगार सहाय्यकांचे कामबंद आंदोलन पुन्हा सुरु*
महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सहाय्यकांच्या फिक्स मानधना संदर्भातील 3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याच्या निषेधार्थ राज्यभरासह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी 1 एप्रिल 2026 पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात पुणे जिल्हा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेच्या वतीने सर्व तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, केंद्र व राज्य शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गेल्या 18 वर्षांपासून कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सहाय्यकांना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाने दि. 3 ऑक्टोबर 2024 रोजी फिक्स मानधनाचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातून ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामरोजगार सहाय्यकांकडून जॉबकार्ड नोंद, मस्टर रोल तयार करणे, दररोज मजुरांची ऑनलाईन हजेरी घेणे, कामाची नोंद ठेवणे, केवायसी करणे. आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. तरीही अपेक्षित मानधन मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मानधनात वाढ करून 8000 रुपये मानधन व 2000 रुपये प्रवास भत्ता देण्यात यावा, तसेच गेल्या 18 महिन्याचे थकीत फिक्स मानधन थेट बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रसह पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक या कामबंद आंदोलनात सहभागी झाले असून राज्यभरात 100 % आंदोलन एकाच वेळी चालू आहें. वरील मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पुणे जिल्हा ग्रामरोजगार सहाय्यक संघटनेचे उपाध्यक्ष श्री केशव तावरे व त्यांच्या सर्व सहकार्याकडून देण्यात आला आहे.
