सुपेतील भीषण अपघातात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा.

Staryug.live

सुपेतील भीषण अपघातात सख्ख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात शोककळा.

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव : 

बारामती तालुक्यातील सुपे गावाजवळ सुपे चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सख्ख्या दोन भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे सुपे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात सोमनाथ दत्तात्रेय ठोंबरे व शुभम दत्तात्रेय ठोंबरे (रा. शेंडगे वाडा, सुपे, ता. बारामती, जि. पुणे) या दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. 
मिळालेल्या माहितीनुसार, दोघे भाऊ रविवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास शाळेतून आपल्या एमएच 42 ई 1878 क्रमांकाच्या दुचाकीवरून घरी जात होते. दरम्यान, सुपे चौफुला मार्गावरील अहिल्यादेवी चौकात वळण घेत असताना त्यांची दुचाकी घसरली. त्याच वेळी समोरून येत असलेल्या एमएच 10 सीआर 5199 क्रमांकाच्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच सुपे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासह पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली.
या अपघाताचा तपास सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण सुपे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांनी दोन्ही भावांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
To Top