दोन व्यावसायिक वाहने व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अपहाराचा आरोप; सुपा पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

Staryug.live
दोन व्यावसायिक वाहने व त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या अपहाराचा आरोप; सुपा पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा

स्टारयुग लाईव्ह. :  मोरगाव 

दोन व्यावसायिक वाहनांचा ताबा परस्पर घेऊन त्यातून मिळणारे उत्पन्न स्वतःकडे वळवून विश्वासघात व अपहार केल्याच्या आरोपावरून सुपा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आशा जयवंत पिसाळ यांनी फिर्याद दिली आहे.

सुपा पोलिस ठाण्यात १२ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री गुन्हा क्रमांक १६४/२०२६ नोंदविण्यात आला. फिर्यादी आशा पिसाळ या सेवानिवृत्त शिक्षिका असून सध्या फोंडवाडा-माळवाडी, ता. बारामती येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मुलगा धनराज जयवंत पिसाळ यांच्या नावावर दोन व्यावसायिक वाहने नोंदणीकृत होती. सदर वाहनांचा दूध वाहतूक व्यवसायासाठी वापर केला जात होता.

फिर्यादीनुसार, वाहनांची देखभाल, दुरुस्ती, चालक व व्यवस्थापनाची कामे फिर्यादींचे पती जयवंत महिपती पिसाळ हयात असताना त्यांचा पुतण्या सतीश हरिश्चंद्र पिसाळ याच्याकडे विश्वासाने सोपविण्यात आली होती. २०१८ मध्ये पतीचे निधन झाल्यानंतरही वाहनांच्या व्यवसायाशी संबंधित कामकाज सुरू होते.

दरम्यान, ४ एप्रिल २०२२ रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा धनराज यांनी दोन्ही वाहनांचा व्यवसाय व प्रत्यक्ष ताबा देण्याची मागणी केली असता सतीश पिसाळ याने कथितरीत्या दबाव टाकून वाहनांचा ताबा व मोबदला देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. ही वाहने ३१ मे २०२६ पर्यंत धनश्री पेट्रोलियम, फोंडवाडा-माळवाडी परिसरात त्याच्या ताब्यात असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर सतीश हरिश्चंद्र पिसाळ याने विनायक दगडू पिसाळ यांच्या मदतीने दूध वाहतूक व्यवसायाच्या नोंदीमध्ये धनराज पिसाळ यांच्या नावाबाबत कथितरीत्या फेरफार करून वाहनांमधून मिळणारे उत्पन्न स्वतःकडे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. १८ जून २०२६ रोजी सतीश हरिश्चंद्र पिसाळ व विनायक दगडू पिसाळ यांनी ही दोन्ही वाहने विश्वनाथ ऊर्फ ईश्वर सरखाराम दगडे व ज्ञानराज विश्वनाथ ऊर्फ ईश्वर दगडे यांच्या ताब्यात दिल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले.

या प्रकरणात सतीश हरिश्चंद्र पिसाळ, विनायक दगडू पिसाळ, विश्वनाथ ऊर्फ ईश्वर सरखाराम दगडे आणि ज्ञानराज विश्वनाथ ऊर्फ ईश्वर दगडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१४, ३१६(२), ३१८(४), ३५१(२), ३५१(३) तसेच कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुपा पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असून हेड कॉन्स्टेबल संदीप सरजेराव लोंढे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. वाहने, त्यांचा ताबा, दूध वाहतूक व्यवसायातून मिळालेले उत्पन्न तसेच संबंधित नोंदी याबाबत पुढील तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
To Top