राम मंदिरातील देणगीच्या पैशांची लूट झाली’; भाजप
सरकारवर संजय राऊतांचा घणाघाती हल्ला
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या नावाने देशभरातून जमा झालेल्या देणगीच्या पैशांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, ‘भाजपच्या राजवटीत राम मंदिर लुटले गेले असून मोदींच्या खात्यात साडेदहा हजार कोटी रुपये गेले,’ असा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोरगाव येथे केला.
आज 22 ऑगस्ट 2026 रोजी मोरगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन व राम रक्षा स्तोत्रपठण महाआरतीचे आयोजन करण्यात आले . यावेळी पुणे जिल्ह्यातून शेकडो शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भापकर यांनी यासाठी सर्व नियोजन केले. याच कार्यक्रमात विविध पक्षातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश घेण्यात आला. यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते.
यावेळी राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ‘देशातील जनतेच्या धार्मिक भावनांचा आधार घेऊन सत्ता मिळविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता मंदिरातील देणगीच्या पैशांचाही हिशेब द्यावा,’ अशी मागणी त्यांनी केली. मंदिरातील देणगीबाबत सीसीटीव्ही व्यवस्था असतानाही गैरप्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.
अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित देणगीच्या व्यवहारांबाबत शिवसेना (उबाठा) यापूर्वीही सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. जुलैमध्ये नागपूर येथे पक्षाच्या ‘रामरक्षा’ आंदोलनादरम्यानही मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. राम मंदिराच्या निर्मितीसाठी गतकाळात कारसेवकांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कौतुक केले.
‘रामाचे नाव घेऊन सत्ता मिळविणाऱ्यांनी रामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा हिशेब द्यावा,’ असे सांगत राऊत यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवरही टीका केली. देशात सध्या सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करत लोकशाही व्यवस्था आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यातील सत्ताधारी भाजप तसेच बारामतीच्या राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या कारभारावरही राऊत यांनी नाव न घेता टीका केली. राज्यातील सत्ताधारी आघाडीच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांमध्ये नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. सत्तेचा वापर जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी होण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘रामरक्षा म्हणजे केवळ रामरक्षा स्तोत्राचे पठण नव्हे, तर रामाच्या नावाने उभ्या राहिलेल्या मंदिराचे आणि भाविकांच्या श्रद्धेचे रक्षण करणे होय,’ अशी भूमिका मांडली. मोरगाव येथील राऊत यांच्या भाषणामुळे बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कार्यक्रमास शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामरक्षा पाठ आणि महाआरतीनंतर शिवसेना बारामती तालुका मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना (उबाठा)ने बारामती तालुक्यात संघटनात्मक ताकद वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
बारामती तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी व पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून सकारात्मक काम करणार असल्याचे यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हनुमंत भापकर यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उल्हास शेवाळे, संपर्कप्रमुख आदिराज कोठाडिया, बारामतीचे तालुकाप्रमुख हनुमंत भापकर, बाळासाहेब शिंदे,संभाजी शिंदे, उमेश जाधव, दत्ता लोणकर, उमेश दुबे, अभिजीत तावरे, शुभांगी टकले, संगीता पोमणे, सविता कुलथे उपस्थित होते.
