इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये सुपा पोलिसांची धडक कारवाई.

Staryug.live


इन्स्टाग्रामवरील ‘आभासी भाईगिरी’ पडली महागात; तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये सुपा पोलिसांची धडक कारवाई.

स्टारयुग लाईव्ह  :    मोरगाव 

सोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळविण्यासाठी हातात शस्त्र घेऊन रील तयार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर सुपा पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करण्यात आली.

दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी सुपा पोलीस ठाण्याच्या सायबर मॉनिटरिंग पथकाच्या निदर्शनास ‘prem_jagtap_0295’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून प्रसारित करण्यात आलेला एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये बाबुर्डी (ता. बारामती) येथील प्रेम प्रताप जगताप याच्या हातात पिस्तूलसदृश्य वस्तू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या व्हिडिओवर ‘आलीशान युवा प्रतिष्ठान’ असा मजकूर टाकण्यात आला होता. तसेच, “शांत है इसका मतलब ये नही की हम संत है..! जंगल अपना है, और कानुन भी अपना है” अशा प्रक्षोभक व धमकीवजा मजकुराचा वापर करण्यात आला होता. व्हिडिओच्या ऑडिओमध्येही एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याचा संदर्भ असल्याने, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल पुणे ग्रामीण जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू असताना त्याचे उल्लंघन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुपा पोलिसांनी स्वतःहून फिर्याद दाखल केली. आरोपी प्रेम जगताप याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५१(२)(३), २२३, भारतीय शस्त्र कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार रुपेश साळुंके करीत आहेत.

सोशल मीडियावरील ‘आभासी भाईगिरी’ला पोलिसांचा इशारा

सोशल मीडियावर शस्त्रांचे प्रदर्शन करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. केवळ रील, लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी केलेली एक चूक कायदेशीर अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
‘रीलसाठी रिअल लाईफ धोक्यात घालू नका’, असा स्पष्ट इशारा देत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आभासी दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सुपा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलीस हवालदार रुपेश साळुंके, पोलीस शिपाई किसन ताडगे, महादेव साळुंके व भाऊसाहेब चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
To Top