मयुरेश्वर मंदिराच्या कामाच्या दर्जावरून मोरगावकर आक्रमक!

Staryug.live
मयुरेश्वर मंदिराच्या कामाच्या दर्जावरून मोरगावकर आक्रमक!
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसमोर ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा; ‘दर्जेदार कामात कोणतीही तडजोड नाही’—सुनेत्रा पवारांचे आश्वासन

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव

अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिराच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांच्या दर्जावरून मोरगावकर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी मयुरेश्वर मंदिरास भेट देऊन मंदिर परिसरात नव्याने करण्यात आलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी थेट उपमुख्यमंत्र्यांसमोरच झालेल्या कामांच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रारींचा पाढा वाचला.
मयुरेश्वर मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला असतानाही प्रत्यक्षात झालेल्या कामांमध्ये अपेक्षित दर्जा दिसून येत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मंदिर हे केवळ मोरगावचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने येथे होणाऱ्या विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी यावेळी मांडली.
विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत ग्रामस्थांना विश्वासात न घेणे, कामाच्या दर्जाबाबत निर्माण झालेले प्रश्न तसेच मंदिराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर व्यक्त केली. यावेळी ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडत संबंधित कामकाजाबाबत जाब विचारला.
ग्रामस्थांची आक्रमक भूमिका आणि त्यांच्या भावना लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मंदिराच्या विकासकामांचा दर्जा उच्च प्रतीचा असणे आवश्यक असून, कामामध्ये कोणतीही हयगय अथवा तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
“मयुरेश्वर मंदिराच्या विकासकामांमध्ये मोरगावकर ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच पुढील कामे केली जातील. ग्रामस्थांच्या सल्ल्यानुसार दर्जेदार पद्धतीने काम करण्यात येईल. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले.
मयुरेश्वर मंदिर हे अष्टविनायकातील प्रथम स्थानाचे तीर्थक्षेत्र असल्याने मंदिराच्या विकासकामांकडे केवळ बांधकाम म्हणून न पाहता धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनाच्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे मंदिर परिसरात होणारे प्रत्येक काम टिकाऊ, दर्जेदार आणि भाविकांच्या सोयीसुविधांना केंद्रस्थानी ठेवूनच व्हावे, अशी अपेक्षा मोरगावकरांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्र्यांच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मंदिराच्या विकासकामांच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता संबंधित विभागाकडून प्रत्यक्ष कामांच्या गुणवत्तेत सुधारणा करून ग्रामस्थांच्या अपेक्षांची पूर्तता केली जाते का, याकडे मोरगावसह संपूर्ण बारामती तालुक्याचे लक्ष लागले आहे
To Top