ग्रामसभा सचिवपदावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा बहिष्कार; सुरक्षेची हमी द्या, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा.

Staryug.live

ग्रामसभा सचिवपदावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा बहिष्कार; सुरक्षेची हमी द्या, अन्य विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा.

स्टारयुग लाईव्ह. :   मोरगाव 

ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (DNE-136) जिल्हा शाखा पुणेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची ठोस हमी मिळेपर्यंत ग्रामसभेच्या सचिवपदाच्या कामकाजावर अनिश्चित काळासाठी बहिष्कार घालण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. याबाबत जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना १८ ऑगस्ट २०२६ रोजी निवेदन देण्यात आले आहे.
पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान ग्रामपंचायत अधिकारी श्री. पी. एन. पाटील यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून, या घटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136च्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे संघटनेने म्हटले आहे. ग्रामसभेच्या कामकाजादरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस हमी आणि प्रभावी उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
१८ ऑगस्टपासून ग्रामसभांच्या सचिवपदावर बहिष्कार
सुरक्षेच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना होईपर्यंत १८ ऑगस्ट २०२६ पासून अनिश्चित कालावधीसाठी ग्रामसभेच्या कामकाजात ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून काम करणार नाहीत, असा स्पष्ट निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये १८ ऑगस्टपासून आयोजित होणाऱ्या तसेच यापूर्वी नियोजित करण्यात आलेल्या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत अधिकारी सचिव म्हणून उपस्थित राहणार नसल्याची भूमिका संघटनेने घेतली आहे.
मात्र, संघटनेने प्रशासनाशी असहकाराची भूमिका न घेता प्रशासनास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या ऐवजी अन्य विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची ग्रामसभेच्या सचिवपदी नियुक्ती करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.
‘सुरक्षा द्या, अन्यथा सचिवपदाची जबाबदारी नको’
ग्रामसभा ही ग्रामीण प्रशासनातील महत्त्वाची प्रक्रिया असली तरी तिच्या कामकाजादरम्यान अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाही, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. त्यामुळे ग्रामसभांचे कामकाज ठप्प होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करावी आणि अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सचिव म्हणून नियुक्ती करण्याबाबत तातडीने आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जिल्हा सरचिटणीस संदीप नारायण ठवाळ आणि जिल्हाध्यक्ष अमोल महादेव घोळवे यांच्या स्वाक्षरीचे हे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्ह्यातील गटविकास अधिकारी तसेच संघटनेच्या तालुका शाखांना देण्यात आल्या आहेत.
ग्रामसभा अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केंद्रस्थानी ठेवून घेतलेल्या या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील आगामी ग्रामसभांच्या कामकाजावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे ग्रामपंचायत स्तरावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
To Top