रानडुकरांच्या धुमाकुळाने राजुरी परिसरातील शेतकरी हैराण; वन विभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप.
स्टारयुग लाईव्ह : राजुरी / विक्रम यादव
पुरंदर व दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या राजुरी गावच्या परिसरात जंगली रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी वर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. यादव वस्ती तसेच खोर परिसरातील डोंबेवाडी भागात रानडुकरांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या या नुकसानीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राजुरी परिसरातील शेतांमध्ये रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप घुसून भुईमूग, मका, कडवळ तसेच विविध पालेभाज्या आणि इतर पिकांची नासधूस करत आहेत. उभ्या पिकांची मुळे उखडणे, पिके तुडवणे आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करणे, असा प्रकार सातत्याने सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रानडुकरांसोबतच चिंकारा, हरीण, ससे आदी वन्यप्राण्यांकडूनही शेतीपिकांचे नुकसान होत आहे.
दुष्काळसदृश परिस्थितीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची भर
एकीकडे वाढती महागाई, शेतीसाठी वाढता उत्पादन खर्च आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यातच वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होत असताना शेतकऱ्यांना हा प्रकार हतबलपणे पाहावा लागत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाययोजना करणे अपेक्षित असताना परिस्थिती गंभीर होऊनही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्या
वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचे वन विभागाने तातडीने पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी. तसेच रानडुकरांसह इतर वन्यप्राण्यांचा शेती परिसरातील वाढता वावर रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राजुरी येथील शेतकरी विक्रम यादव यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. पिकांचे नुकसान होण्यापूर्वीच वन विभागाने जागे होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
