कमरेला गावठी पिस्तूल; साथीदारांकडे घातक हत्यारे! बारामती शहर पोलिसांचा सापळा
बारामती : स्टार युग लाईव्ह
बेकायदेशीर अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात बारामती शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रदीप सुरेश नकाते (वय २७, रा. महात्मा फुलेनगर, आमराई, बारामती) याला गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले.
९ ऑगस्ट रोजी पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांना मिळालेल्या माहितीनुसार, नकाते हा कमरेला पिस्तूल घेऊन काही साथीदारांसह फिरत होता. त्याच्या साथीदारांकडे कोयत्यासारखी घातक हत्यारे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. अंगझडतीत सुमारे २५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल व ४०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२०२६, शस्त्र अधिनियम कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान नकातेचे तीन साथीदार अजय सकट, रोहीत सोनवणे व गणेश पाठक पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या भूमिकेचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, नकाते याच्याकडून यापूर्वीही २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक गांभीर्याने केला जात असून, शस्त्र कुठून मिळाले आणि त्यामागे कोणती साखळी आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, पोलीस शिपाई अक्षय सिताफ यांच्या गोपनीय माहिती संकलनामुळे २०२४ ते २०२६ या तीन वर्षांत बारामती शहर पोलिसांनी एकूण सहा अग्निशस्त्रे हस्तगत केली आहेत. त्यामुळे पोलिसांच्या स्थानिक ‘इंटेलिजन्स नेटवर्क’ची परिणामकारकता अधोरेखित झाली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर करीत आहेत.