कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा; ज्ञानेश्वर राऊत यांचा जिल्हास्तरीय गुणवंत कलाशिक्षक पुरस्काराने गौरव

Staryug.live

कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा; ज्ञानेश्वर राऊत यांचा जिल्हास्तरीय गुणवंत कलाशिक्षक पुरस्काराने गौरव

  स्टारयुग लाईव्ह. :    मोरगाव 

रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथील विशेष शिक्षक – कला श्री. ज्ञानेश्वर शंकर राऊत यांच्या उल्लेखनीय कलाशैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना जिल्हास्तरीय गुणवंत कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सन्मानामुळे मोरगावच्या शैक्षणिक व कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळ, जिल्हा शाखा पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते श्री. राऊत यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.श्री. ज्ञानेश्वर राऊत हे विद्यार्थ्यांमध्ये कलाविषयक आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. चित्रकला, हस्तकला, विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम, कला स्पर्धा तसेच सर्जनशील उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन उल्लेखनीय ठरले आहे.

‘प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक कलाकार दडलेला असतो, त्याच्या सर्जनशीलतेला योग्य दिशा आणि संधी मिळणे गरजेचे आहे’ या भावनेतून श्री. राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थ्यांनी विविध कला उपक्रमांमध्ये सहभाग घेत आपली कलात्मक क्षमता विकसित केली आहे. शिक्षणाबरोबरच कला ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे, या दृष्टिकोनातून त्यांनी विद्यालयात विविध कलाविषयक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली आहे.

या उल्लेखनीय पुरस्काराबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी श्री. ज्ञानेश्वर राऊत यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांच्या या यशामुळे श्री मयुरेश्वर विद्यालयाच्या शैक्षणिक तसेच कला क्षेत्रातील कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे.
“कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिशा देणाऱ्या शिक्षकाचा हा सन्मान म्हणजे केवळ एका शिक्षकाचा गौरव नसून संपूर्ण विद्यालयाचा गौरव आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. राऊत यांचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे,” अशी माहिती विद्यालयाच्या प्रसिद्धीप्रमुख सारिका तांबे यांनी दिली.

To Top