कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात उत्साहात साजरी

Staryug.live


कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती १३९ वी मोरगावच्या मयुरेश्वर विद्यालयात उत्साहात साजरी

स्टारयुग लाईव्ह.   :   मोरगाव

रयत शिक्षण संस्थेचे श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, शिक्षणमहर्षी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली. कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक विचारांचा जागर करत विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक व सांस्कृतिक कलाविष्कार सादर केले.

जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. पोपट तात्या तावरे, माजी सरपंच श्री. निलेश केदारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे, पर्यवेक्षिका सौ. मंदाकिनी शिंदे तसेच विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर विद्यार्थ्यांनी लेझीम पथक, झांज पथक, टिपरी नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध पथकांचे सादरीकरण आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात जयंती सोहळ्याचे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. विविध कलाविष्कारांसह निघालेल्या या मिरवणुकीने मोरगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साहातून कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक कार्याची आणि रयत शिक्षण संस्थेच्या विचारांची प्रभावीपणे उजळणी झाली.
‘शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन’ हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात घेतलेल्या उत्स्फूर्त सहभागामुळे जयंती सोहळ्याला विशेष रंगत आली.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केले. कर्मवीर अण्णांच्या विचारांना अभिवादन करत शिक्षण, समता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत १३९ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

To Top