श्री मयुरेश्वरास ‘दवण्याची’ आरास
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिर गाभार्यात आज दुपारी दवण्याची आरास करण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या कालावधीत विविध धार्मिक ठिकाणी ही परंपरा जोपासली जाते. आज विनायकी चतुर्थीचा योग साधून येथील श्रींचा गाभारा मनमोहक सजवण्यात आला.
मोरगाव येथे शेकडो वर्षांची ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. मुद्दल पुराणातील शास्त्रानुसार त्या त्या दैवतांना दमन विधी करून दवणा वाहण्याची पूर्वपरंपरा प्रथा आहे. अशी माहिती मोरगाव येथील पुरोहित किशोर काका वाघ यांनी दिली. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला उन्हाळा सुरू होतो या कालावधीत उष्णतेचा दाह कमी करण्यासाठी या धार्मिक मंदिरातून ही परंपरा आहे.
आज भाविक श्री गणेशाच्या दर्शनासाठी जात असताना दूर्वा फुलां ऐवजी सुगंधी दवणा वाहण्याची पारंपरिक प्रथा व परंपरा मोरगाव येथे पाळली जाते. श्रींची दुपारी महापूजा झाल्यानंतर व दुपारी चार वाजता पारंपारिक आठवडेकरी गुरव पुजारी यांनी गाभार्यात सुगंधी दवण्याची आरास केली.
