ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवण्यासाठी सभापती मार्फत संयुक्त बैठकीचे आयोजन

Staryug.live
Baramati स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

बारामती तालुक्यातील विविध ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अनेक वर्षापासूनचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती किरण तावरे यांची भेट घेतली. ग्रामपंचायत विभागाशी संबंधित सर्वच अधिकारी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची एकत्रित संयुक्त मीटिंग घ्यावी असे साकडे यावेळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने घालण्यात आले.

बारामती तालुक्यातील सुमारे 99 हून अधिक ग्रामपंचायत काम करत असलेल्या 600 पेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न गेल्या दहा वर्षाहून अधिक काळापासून धुळखात प्रलंबित आहेत. या अडचणीच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्याने गाव पातळीवर काम करणारा ग्रामपंचायत वर्ग त्रस्त झाला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सुटाव्यात या प्रमुख उद्देशाने पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक कॉम्रेड ज्ञानोबा घोणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष राहुल तावरे व सचिव भोलेनाथ खोमणे यांच्या उपस्थितीत संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच बारामती पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती किरण तावरे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न व अडचणी सांगितल्या.

यामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन पगार, किमान वेतनाचा फरक, राहणीमान भत्ता, भविषय निर्वाह निधी, सेवा पुस्तक अद्यावत करणे, तसेच विविध ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची होत असलेली पिळवणूक याबाबत लेखी निवेदन सभापतींना देऊन प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांची संयुक्त मीटिंग घ्यावी असे विनंती वजा साकडे नुकतेच घातले.

यावेळी संस्थापक कॉम्रेड ज्ञानोबा घोणे तालुकाध्यक्ष राहुल तावरे, सचिव भोलेनाथ खोमणे, कुंडलिक कुचेकर, संजय दुबळे, अभिजीत गवळी, सोमनाथ कुंभारकर, मारुती खोमणे, कमल जगताप, नंदा जराड, पल्लवी बागाव आदी पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न लवकरच एकत्रित संयुक्त मीटिंग घेऊन मार्गी लावू असे आश्वासन यावेळी नवनिर्वाचित सभापती किरण तावरे यांनी पदाधिकारी शिष्टमंडळाला दिले.
To Top