बहुरूपी कला चालली काळाच्या पडद्याआड, शासनाच्या दुर्लक्षामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ

Staryug.live
बहुरूपी कला चालली काळाच्या पडद्याआड, मनोरंजनाच्या विविध साधनांमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ.

मोरगाव : स्टारयुग लाईव्ह

 एकेकाळी गावागावांत, जत्रा-उत्सवांमध्ये आणि लोकजीवनात रंगत आणणारी बहुरूपी कला आज हळूहळू काळाच्या पडद्याआड जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. विविध सोंगं घेऊन लोकांचे मनोरंजन करणारे बहुरूपी कलाकार आता अत्यंत कमी झाले असून, या पारंपरिक कलेला अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बहुरूपी कलाकार वेगवेगळ्या वेशभूषेत देव-देवतांचे, ऐतिहासिक व्यक्तींचे तसेच सामाजिक संदेश देणाऱ्या व्यक्तिरेखांचे सोंग घेऊन गावागावांत फिरत असत. त्यांच्या कलेतून लोकांचे मनोरंजन तर होतच, पण त्याचबरोबर समाजप्रबोधनही होत असे. मात्र, आधुनिक तंत्रज्ञान, मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे या कलेची लोकप्रियता घटत चालली आहे.

आजच्या तरुण पिढीचा या कलेकडे ओढा कमी झाल्याने नवीन कलाकार पुढे येत नाहीत असे मत जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथील बहुरूपी कलाकार कैलास शेगर यांनी बोलताना व्यक्त केले परिणामी, बहुरूपी कलेची परंपरा जपणारे काही मोजकेच ज्येष्ठ कलाकार उरले आहेत. त्यांनाही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने ही कला टिकवणे अधिक कठीण झाले आहे.

स्थानिक प्रशासन आणि सांस्कृतिक विभागाकडून या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. शाळा-कॉलेजांमध्ये बहुरूपी कलेचे कार्यक्रम आयोजित करणे, कलाकारांना आर्थिक मदत देणे तसेच विविध महोत्सवांमध्ये त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

जर वेळेत योग्य पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्राची ही समृद्ध लोककला इतिहासजमा होण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने या कलाकारांसाठी विशेष मोहीम राबवून ही कला जतन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करावे असे मत यावेळी शेगर यांनी व्यक्त केले.
To Top