बारामती तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांना गॅस टंचाईच्या झळा

Staryug.live
बारामती तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांना तीव्र गॅस टंचाई

*मोरगाव : स्टारयुग लाईव्ह*

 बारामती तालुक्यातील हॉटेल व खानावळ व्यवसायिकांना सध्या तीव्र गॅस टंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत.

गॅस सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाकाची कामे उशिरा सुरू होत असून ग्राहकांची गैरसोय होत आहे. काही हॉटेल व्यवसायिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून लाकूड किंवा इतर इंधनांचा वापर सुरू केला आहे, मात्र त्यामुळे खर्च वाढत असून पर्यावरणीय समस्या निर्माण होत आहेत.

तालुक्यातील मूर्टी, मोरगाव, सुपे, सोमेश्वर नगर, माळेगाव, लोणी भापकर, पणदरे आदी भागातील हॉटेल व्यवसायिकांना गॅस टंचाईचा तीव्र सामना करावा लागत आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दररोजच्या व्यवसायासाठी गॅस अत्यावश्यक आहे. पुरवठ्यातील अडचणीमुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा.”

दरम्यान, गॅस वितरकांकडून वाहतूक व वितरण व्यवस्थेत अडथळे असल्याचे कारण पुढे केले जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी हॉटेल व्यवसायिकांकडून होत आहे.

या गॅस टंचाईमुळे बारामतीतील खाद्यव्यवसायावर मोठा परिणाम होत असून, परिस्थिती लवकर सुधारली नाही तर व्यवसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
To Top