अन्यायकारक भारनियमनाच्या विरोधात पाटील मळा ग्रामस्थांचे भजन करत गांधीगिरी आंदोलन.
मोरगाव : स्टारयुग लाईव्ह
मोरगाव परिसरातील वाड्या वस्त्यांवर सध्या सुरू असलेल्या अन्यायकारक भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या पाटील बुवा मळा येथील ग्रामस्थांनी मोरगाव वीज वितरण कार्यालयात अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन छेडले. गावातील नागरिकांनी कार्यालयाच्या परिसरात एकत्र येत भजन-कीर्तन करत आपला संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून मोरगाव परिसरात वारंवार आणि अनियमित वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः शेतकरी, लघुउद्योग व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही वीज वितरण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी आक्रमक मार्ग न अवलंबता गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वीज वितरण कार्यालयासमोर बसून टाळ-मृदंगाच्या साथीने भजन-कीर्तन सुरू केले. “विज द्या, न्याय द्या” अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामस्थांनी सांगितले की, “आम्हाला भांडण नको, पण न्याय हवा. वारंवार होणारे भारनियमन थांबवून नियमित वीजपुरवठा करावा.” महिलांचाही या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला.
दरम्यान, वीज वितरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करत लवकरच समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या अनोख्या गांधीगिरी आंदोलनाची परिसरात सर्वत्र चर्चा होत असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
