मोरगावात रखवालदाराने जीवाची बाजी लावून केला चोरट्यांचा प्रतिकार, रखवालदाराच्या धाडसी कृत्याचे परिसरात कौतुक, सन्मान करण्याची नागरिकांची मागणी.

Staryug.live
गावच्या रखवालदाराने जीवाची बाजी लावून केला चोरट्यांचा प्रतिकार; धाडसी कार्याचे परिसरात कौतुक.

मोरगाव  :  स्टारयुग लाईव्ह

बारामती तालुक्यातील मोरगाव गावात घडलेल्या धाडसी घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील रखवालदाराने जीवाची पर्वा न करता चोरट्यांचा सामना करत त्यांच्या प्रयत्नांना हाणून पाडले. त्याच्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे गावकऱ्यांमध्ये त्याच्याबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.

अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता. बारामती येथील ग्रामपंचायत मार्गावर असणाऱ्या तुळजाभवानी ज्वेलर्स या सराफी दुकानात मध्यरात्रीच्या 2 : 30 वेळेस सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी गावात प्रवेश करून ते फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी गस्त घालत असलेल्या लालबहादूर बालबहादुर बिस्टा ( साथी ) रखवालदाराच्या लक्षात ही बाब येताच त्याने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

 चोरट्यांना अडवताना त्याने धैर्याने त्यांच्याशी झुंज दिली. परंतु चोरट्यांनी त्याच्या अंगावर गाडी घालून जीव मारण्याचा प्रयत्न केला. हातात असलेल्या काठीने रखवालदार असलेल्या लालबहादूरणे चोरट्यांच्या गाडीवर हातातील काठीचा जोरदार प्रहार केला. परंतु तीन चोरट्यांच्या तकदीपुढे त्याचा प्रतिकार प्रयत्न अपुरा ठरला असला तरी त्याच्या धाडसाने गावातील मोठ्या चोरीचा प्रयत्न हाणून पडला हे मात्र नक्की.

या झटापटीदरम्यान रखवालदाराला किरकोळ दुखापत झाली, मात्र त्याने हार न मानता चोरट्यांना पळ काढण्यास भाग पाडले. त्याच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
घटनेनंतर आज मोरगाव मध्ये गावकऱ्यांनी रखवालदाराचे विशेष कौतुक करत त्याला सन्मानित करण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलिसांनीही या घटनेची नोंद घेत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.या प्रसंगामुळे गावात सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढली असून, रखवालदाराच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

To Top