बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर व‘सुपा’ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्री राजरोस;
व्यवसायिकांना पोलिसांचा छुपा पाठिंबा
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर व सुपा येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. सर्व परिस्थिती माहीत असूनही याकडे दुर्लक्ष का ? असा सवाल नागरिक विचारतात. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ कारवाई करण्याऐवजी डोळे झाकून घेतले आहेत. अशी चर्चा आहे. याचा लाभ कुणाला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ऐतिहासिक परगाना अशी या परिसराची ओळख आहे. परंतु सध्या येथील गैरव्यवसायांना सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे. गावातील सर्व किरकोळ दुकाने, टपऱ्या तसेच इतर ठिकाणी खुलेआम गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. यातून हजार रुपयांची आर्थिक उलाढाल आहे.
राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्रीवर बंदी घातलेली आहे. तरीही सुपा परिसरात या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जातो. विशेष म्हणजे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा ठेवून त्याची घाऊक आणि किरकोळ विक्री केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून दिली जात आहे.
गुटखा विक्रीमुळे विशेषतः युवक आणि अल्पवयीन मुलांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, तोंडाचा कर्करोग आणि इतर आजारांचा धोका लक्षात घेता प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा संबंधित विभागांकडे तक्रारी करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने अवैध व्यवसायिकांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे पोलिसांनी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सुपा परिसरात अवैध गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होतो, त्यामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा शोध घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. अचानक धाडी, साठ्यांची तपासणी आणि पुरवठा साखळीवर कारवाई केल्यास या अवैध व्यवसायाला आळा बसू शकतो, असे जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, गुटखा विक्रीविरोधात प्रभावी मोहीम राबवून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि युवकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी बंदी आणावी, अशी मागणी वडगाव निंबाळकर व सुपे परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
वडगाव निंबाळकर आणि 'सुपा' दोन्ही ठिकाणी गुटखा विक्रीचे नेटवर्क तालुक्याचे पश्चिम भागात या दोन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवस अवैध गुटख्याची विक्री केली जाते. यासाठी अनेक पोलीस कर्मचारी सामील आहेत. हे सर्व पोलिसांचे तत्काळ चौकशी करून यांची वृद्ध कारवाई करावी अशी मागणी बारामतीच्या ग्रामीण भागातून होत आहे
