पाटील मळा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व ढोल ताशाच्या गजरात स्वागत

Staryug.live
पाटील मळा जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक; नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान

स्टारयुग लाईव्ह मोरगाव

 शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी बारामती तालुक्यातील मोरगावजवळील पाटील मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षकवृंद व पालकांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागत सोहळ्यामुळे शाळा परिसर आनंदाने फुलून गेला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. रंगीबेरंगी फुगे, पुष्पसजावट आणि आनंददायी वातावरणामुळे शाळा परिसर उत्सवमय झाला होता. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच फुग्यांच्या आकर्षक सजावटीतून त्यांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षणाची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रतीकात्मक फीत कापून नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेमाने शाळेत प्रवेश देत त्यांचे अभिनंदन केले.

विशेष म्हणजे इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना पुष्पगुच्छ, पाठ्यपुस्तक गणवेश भेटवस्तू व शुभेच्छा देऊन शालेय जीवनाच्या नव्या प्रवासासाठी प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे नवप्रवेशित विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सुवर्णा गायकवाड, शिक्षिका स्वाती निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रेमळ आणि उत्साहवर्धक स्वागतामुळे चिमुकले विद्यार्थी भारावून गेले. शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्यास आणि शाळेबद्दल आपुलकी वाढविण्यास अशा उपक्रमांची मोठी मदत होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पाटील मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने विद्यार्थ्यांचे केलेले हे अनोखे स्वागत परिसरात चर्चेचा विषय ठरले असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
To Top