मोरगावात संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत; दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

Staryug.live


मोरगावात संत बाळूमामा पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत; दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन.

 स्टार लाईव्ह : मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे संत बाळूमामा देवालय, आदमापूर येथील पालखी सोहळा (बग्गा क्रमांक 19) व मेंढी माऊलीचे गुरुवार, दि. 16 जुलै 2026 रोजी मयुरेश्वर नगरीत उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पुढील दोन दिवस मोरगावमध्ये मुक्कामी असणाऱ्या या पालखी सोहळ्याचे ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या थाटामाटात, भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत केले.

पालखीच्या स्वागतासाठी मोरगाव परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. "बाळूमामांच्या नावाचा गजर", भंडाऱ्याची उधळण, ढोल-ताशे व पारंपरिक वाद्यांचा निनाद, डीजेच्या तालावर भक्तांचा उत्साह आणि फटाक्यांच्या आतषबाजीत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.

हा भव्य पालखी सोहळा मोरगाव–आंबे रस्त्यावरील बिरोबा मंदिराजवळ विसावला. पालखीच्या आगमनामुळे परिसरात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

पालखी आगमनानिमित्त आज ह.भ.प. श्रीराम महाराज गुलदगड तावशीकर यांचे संत बाळूमामांच्या पवित्र चरित्रावर आधारित कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यानंतर रात्री 9.00 वाजता महाआरती होणार असून, सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मोरगाव व परिसरातील सर्व बाळूमामा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संत बाळूमामा देवालय बया कमिटी, मोरगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्यामुळे मोरगाव नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले असून, पुढील दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.

To Top