दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात वकृत्व स्पर्धा; विद्यार्थ्यांनी उलगडला दादांचा जीवनपट.
स्टारयुग लाईव : मोरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या मूर्टी (ता. बारामती) येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त प्रेरणादायी वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावे तसेच अजित दादा पवार यांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा परिचय व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत विद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अजित दादा पवार यांच्या सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक आणि लोकाभिमुख कार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. स्पर्धकांनी दादांच्या नेतृत्वगुणांबरोबरच त्यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा उल्लेख करत उपस्थितांची मने जिंकली.
स्पर्धेच्या निकालात सार्थक भानुदास कारंडे याने प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री लाला जाधव हिने द्वितीय, तर समृद्धी सोमनाथ तांबे हिने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. विजेत्या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
या वकृत्व स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख श्रीमती ए. बी. भापकर तसेच मुख्याध्यापक आर. के. बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्टरीत्या करण्यात आले. शिक्षकांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रसंगी ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला उत्स्फूर्त दाद दिली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचार मांडण्याची क्षमता आणि महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याची भावना निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.
