बालवारकऱ्यांच्या गजरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील मळा येथे पारंपरिक आषाढी दिंडी उत्साहात.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
पंढरपूर येथील आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटील मळा येथे पारंपरिक आषाढी वारकरी दिंडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. संत परंपरा, वारकरी संस्कृती आणि भक्तीचा वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, विठ्ठल-रुक्मिणी, वारकरी तसेच टाळकरी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग घेतला. हातात टाळ, भगवे पताके, तुळशीची माळ आणि मुखी "ज्ञानबा-तुकाराम", "पांडुरंग हरी विठ्ठल" अशा भक्तिमय गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला. बालवारकऱ्यांच्या निरागस भक्तिभावाने उपस्थितांचे मन जिंकले.
दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. वारकरी संप्रदायातील समता, बंधुभाव, शिस्त, सेवा आणि भक्ती या मूल्यांची माहिती देत विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका सुवर्ण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षिका स्वाती निंबाळकर यांनी उत्कृष्टरीत्या केले. शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
अशा सांस्कृतिक आणि संस्कारक्षम उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक परंपरेची ओळख निर्माण होण्याबरोबरच सामाजिक ऐक्य, शिस्त, सहकार्य आणि भारतीय संस्कृतीबद्दल आदराची भावना अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील मळा येथील या अभिनव उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
