मोरगावच्या श्री मयुरेश्वर विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची पहिली जयंती साजरी.
स्टारयुग लाईव : मोरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बुधवार, 22 जुलै रोजी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, राज्याच्या विकासासाठी दिलेले योगदान तसेच शिक्षण, शेती, उद्योग आणि ग्रामीण विकास क्षेत्रात केलेल्या कामांचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्वक उल्लेख केला.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी विद्यार्थ्यांना अजितदादा पवार यांच्या कार्याचा परिचय करून देत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही आदरपूर्वक अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व भावपूर्ण वातावरणात पार पडले.
