मयुरेश्वर विद्यालयाने राखली शिष्यवृत्ती परीक्षा निकालाची परंपरा
स्टार युग लाईव्ह : मोरगाव
रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर विद्यालय, मोरगाव येथील इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल अत्यंत अभिमानास्पद लागला असून, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी परीक्षेस ७ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले.
यामध्ये कांबळे आर्यन कुंडलिक (२२० गुण), कु. तावरे स्वराली मनोहर (२१८ गुण), कु. तावरे समीक्षा मारुती (१५४ गुण), कु. आरोही रामदास चांदगुडे (१४८ गुण), वि. गायकवाड शिवम संदीप (१४० गुण), कु. चांदगुडे वैष्णवी विकास (१३८ गुण) आणि वि. वाघमारे अनिकेत गजानन (१३४ गुण) यांनी उल्लेखनीय यश संपादन करून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
या यशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदन समारंभास स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मनोहर तावरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी व ओघवते सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक प्रवीण आटोळे यांनी केले.
यावेळी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती विभागप्रमुख अमोल जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारे मार्गदर्शक शिक्षक अमोल बोडरे, सविता खराटे, विद्या जगताप आणि विद्या फाळके यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थ्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केल्याचे सांगत मुख्याध्यापकांनी सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यालयाची यशाची गौरवशाली. परंपरा कायम वृद्धिगत राहो हीच सदिच्छा व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला.. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक विजय हाडके देखील उपस्थित होते अशी माहिती प्रमुख सारिका तांबे यांनी दिली
