नीरा–मोरगाव मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; वाहनचालकांचा जीव धोक्यात, डांबरीकरणाच्या कामावर नागरिकांचा सवाल.
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील नीरा–मोरगाव हा प्रमुख मार्ग सध्या खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून वाहनचालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांनी संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या मार्गावरून दररोज शालेय विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार तसेच श्री क्षेत्र मोरगावला येणारे भाविक मोठ्या संख्येने प्रवास करतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही आणि त्यामुळे अनेक किरकोळ अपघात घडत आहेत.
स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली असतानाही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. काही ठिकाणी करण्यात आलेली तात्पुरती दुरुस्तीही पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, या मार्गावरील डांबरीकरणाच्या कामाबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाला का, कामाची गुणवत्ता तपासली जाणार का आणि अखेर दर्जेदार डांबरीकरण कधी होणार, असे सवाल नागरिक विचारत आहेत.
अपघातांची संख्या वाढण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून सर्व खड्डे बुजवावेत आणि संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी वाहनचालक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
