मोरगाव ग्रामपंचायतीचा सुरक्षा आराखडा मजबूत'तिसऱ्या डोळ्याच्या' नजरेत संपूर्ण मोरगाव; ५४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणीच्या अंतिम टप्प्यात

Staryug.live

मोरगाव ग्रामपंचायतीचा सुरक्षा आराखडा मजबूत
'तिसऱ्या डोळ्याच्या' नजरेत संपूर्ण मोरगाव; ५४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणीच्या अंतिम टप्प्यात

स्टारयुग लाईव्ह :  मोरगाव 

बारामती तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोरगाव ग्रामपंचायतीने गावाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली आणण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत गावात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे उभारण्यात येत असून, सध्या ३२ कॅमेऱ्यांद्वारे गावावर चोवीस तास नजर ठेवली जात आहे. उर्वरित २२ कॅमेरे बसविण्याचे काम वेगाने सुरू असून, लवकरच एकूण ५४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून संपूर्ण गावाचे प्रभावी निरीक्षण केले जाणार आहे.
गावातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर हे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. त्यामुळे संशयास्पद हालचालींवर तात्काळ लक्ष ठेवणे, गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणे, चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यास मोठी मदत होणार आहे.
याबाबत माहिती देताना सरपंच अलकामाई तावरे आणि ग्रामपंचायत अधिकारी दीपक बोरवली यांनी सांगितले की, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रकल्प राबविण्यात येत असून, उर्वरित कॅमेरे कार्यान्वित झाल्यानंतर संपूर्ण मोरगाव 'तिसऱ्या डोळ्याच्या' देखरेखीखाली येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित, सुसज्ज आणि गुन्हेमुक्त गाव घडविण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे भविष्यात गुन्हेगारी, चोरी, सार्वजनिक ठिकाणी होणारे अनुचित प्रकार तसेच वाहतूक शिस्तीवरही प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, मोरगावच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल इतर गावांसाठीही आदर्श ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
To Top