बारामतीच्या जिरायत भागातील पाझर तलाव व बंधारे तातडीने भरावेत; शिवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Staryug.live


बारामतीच्या जिरायत भागातील पाझर तलाव व बंधारे तातडीने भरावेत; शिवसेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

स्टार युग लाईव्ह :   मोरगाव

बारामती तालुक्यातील जिरायत पट्ट्यात यंदा अपेक्षेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः सुपा परगणा, मोरगाव, लोणी भापकर व परिसरातील गावांमध्ये पाण्याअभावी खरीप पिकांसह आगामी रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन जिरायत भागातील छोटे-मोठे पाझर तलाव तसेच करा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे तातडीने भरून देण्याची मागणी केली.

शिवसेनेचे हनुमंत भापकर, बाळासाहेब यशवंत शिंदे (उपजिल्हाप्रमुख), दत्तात्रय तुकाराम लोणकर (शिवसेना वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख), निखिल देवकाते (युवा सेना तालुकाप्रमुख), सर्वेश वाघ (शहरप्रमुख) आणि दादा दळवी (शाखाप्रमुख) यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदा जिरायत भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने अनेक पाझर तलाव व जलसाठे रिकामे आहेत. सध्या नीरा व भीमा नद्या पाण्याने भरून वाहत असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून जानाई-शिरसाई योजना तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात यावे.

या पाण्याद्वारे सुपा परगणा, मोरगाव, लोणी भापकर व परिसरातील छोटे-मोठे पाझर तलाव तसेच करा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून दिल्यास भूजल पातळीत वाढ होईल, विहिरी व बोअरवेलना पाणी उपलब्ध होईल आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा दिलासा मिळेल. तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासही मदत होईल.

शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

To Top