दोन महिन्यांनंतर श्री मयुरेश्वर मंदिर भाविकांसाठी आज खुले; मोरगाव सज्ज, पारंपरिक स्वागताची जय्यत तयारी
स्टार युग लाईव्ह : मोरगाव
गेल्या दोन महिन्यांपासून विविध विकासकामांमुळे भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेले मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर आज, गुरुवार दि. ९ जुलै २०२६, रोजी सकाळी १० वाजता पुन्हा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मंदिर खुले होत असल्याने मोरगावसह परिसरातील आणि राज्यभरातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंदिर खुले होण्याच्या निमित्ताने मोरगाव ग्रामस्थ, मंदिर प्रशासन आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे पारंपरिक पद्धतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. गावातील प्रमुख मार्गांवर ढोल-ताशे, लेझीम, पारंपरिक वाद्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे भक्तांचे स्वागत केले जाणार असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणाने दुमदुमून जाणार आहे.
यावेळी मंदिरात धार्मिक परंपरेनुसार विविध पूजाविधी, मंत्रोच्चार, आरती आणि इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर नव्या स्वरूपात सजलेले मंदिर आणि परिसर भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.
श्री मयुरेश्वरांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. गावातील नागरिकांनीही भाविकांचे मनापासून स्वागत करण्याची तयारी पूर्ण केली असून आजचा दिवस मोरगावसाठी भक्ती, आनंद आणि उत्साहाचा ठरणार आहे.
