"कर्मचाऱ्यांच्या मर्जीसाठी विद्यार्थ्यांचा बळी! मयुरेश्वर विद्यालयात चिखलात बसून डबा खाण्याची संतापजनक वेळ"
स्टार युग लाईव्ह : मोरगाव
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या वर्गखोलीत डबा खाण्यास बंदी घालण्यात आल्याने शेकडो विद्यार्थ्यांना पावसाळ्यात चिखलाने भरलेल्या मैदानात बसून जेवण करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानापेक्षा काही कर्मचाऱ्यांची सोय महत्त्वाची मानली जात असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे.
विद्यालय प्रशासनाकडून वर्गखोल्यांमध्ये डबा खाल्ल्यास घाण होते, साफसफाई करावी लागते, असे कारण पुढे केले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांसाठी पर्यायी स्वच्छ व्यवस्था न करता थेट वर्गात जेवणास बंदी घालणे कितपत योग्य, असा सवाल पालक उपस्थित करत आहेत.
पावसामुळे मैदान चिखलमय झालेले असतानाही विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी बसून डबा खावा लागत असल्याचे चित्र संतापजनक आहे. अनेक विद्यार्थी उभे राहून किंवा ओल्या जमिनीवर बसून जेवत असल्याचे पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
गावात सुरू असलेल्या चर्चेनुसार, विद्यालयाचे मुख्याध्यापक काही मुजोर कर्मचाऱ्यांसमोर हतबल झाले असून, त्यांच्यावर प्रभावी नियंत्रण नसल्याने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय मागे पडत आहेत. या परिस्थितीचा फटका मात्र निष्पाप विद्यार्थ्यांना बसत आहे.
रयत शिक्षण संस्थेची राज्यभर शिस्त, गुणवत्ता आणि विद्यार्थीहिताची ओळख असताना मोरगावमधील हा प्रकार संस्थेच्या प्रतिमेलाच तडा देणारा असल्याची प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे.
पालकांनी रयत शिक्षण संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी केली असून, विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी जेवण्याची त्वरित व्यवस्था करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
आता प्रश्न असा आहे की, विद्यार्थ्यांना चिखलात बसवून डबा खायला लावणाऱ्या या व्यवस्थेची जबाबदारी नेमकी कोण घेणार? रयत शिक्षण संस्था या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ठोस निर्णय घेणार, की विद्यार्थ्यांची ही परवड अशीच सुरू राहणार?
