टाकी भरलेली, नळ कोरडे; मयुरेश्वर विद्यालयाचा निष्काळजी कारभार पुन्हा उघड!

Staryug.live



टाकी भरलेली, नळ कोरडे; मयुरेश्वर विद्यालयाचा निष्काळजी कारभार पुन्हा उघड!

स्टारयुग लाईव : मोरगाव

 रयत शिक्षण संस्थेच्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यालयाच्या छतावरील पाण्याच्या टाकीत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतानाही, केवळ देखभाल-दुरुस्तीचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांसाठी असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ कोरडे पडले आहेत.

दुपारच्या जेवणाच्या सुटीत शेकडो विद्यार्थी हात धुण्यासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी नळांजवळ येतात. मात्र नळातून पाण्याचा एक थेंबही येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पाणी उपलब्ध असूनही ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने हा प्रकार पाणीटंचाईचा नसून, निष्काळजी प्रशासन आणि देखभाल-दुरुस्तीच्या अभावाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देणे ही शाळा प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे. मात्र या जबाबदारीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पालक व नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने नादुरुस्त नळांची दुरुस्ती करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी केली आहे. तसेच रयत शिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि शिक्षण विभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही जोर धरत आहे.

मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेनंतर आता पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचाही प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासन यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
To Top