अजितदादा असते तर ? शाळेच्या वर्गखोल्यांचे काम आतापर्यंत सुरू झाले असते; मोरगावकरांची खंत

Staryug.live


अजितदादा असते तर ? 
शाळेच्या वर्गखोल्यांचे काम आतापर्यंत सुरू झाले असते; मोरगावकरांची खंत
    
   स्टारयुग लाईव्ह  :   मोरगाव : 

 मोरगाव ता बारामती येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयासाठी १८ नवीन वर्गखोल्या उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रस्ताव अनेक महिन्यांपासून रखडला आहे. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सुमारे चार ते पाच कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाचा हा प्रकल्प प्रत्यक्षात अजूनही सुरू न झाल्याने, "अजितदादा असते तर या कामाला आतापर्यंत नक्कीच प्रारंभ झाला असता," अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

        मोरगाव सह परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, वाढत्या विद्यार्थीसंख्येनुसार प्रशस्त वर्गखोल्या उभारण्यात याव्यात आणि शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने १८ वर्गखोल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. येथे दर्जेदार इमारत करण्याचे अजितदादा पवार यांची संकल्पना होती. विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, सुरक्षित इमारत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे वातावरण मिळण्याची अपेक्षा होती.

           सध्या येथील उपलब्ध इमारत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी अपुरी आहे. जुनी वास्तू शाळेची इमारत कौलारू व मोडकळीस आलेले धोकेदायक आहे.यामुळे विद्यार्थ्यांना येथे बसवता येत नाही. नवीन बांधकामासाठी प्रस्ताव मंजुरीच्या आणि प्रशासकीय प्रक्रियेत अडकून राहिल्याने प्रत्यक्ष बांधकामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना उपलब्ध वर्गखोल्यांमध्येच शिक्षण घ्यावे लागत असून, वाढत्या विद्यार्थीसंख्येमुळे शाळेच्या व्यवस्थापनावर ताण येत आहे.

         ग्रामस्थांच्या मते, विकासकामांच्या बाबतीत वेगवान निर्णय आणि पाठपुरावा ही अजितदादा पवार यांची कार्यशैली होती. या कामाचा प्रस्तावित आराखडा प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव त्यांच्या काळात तातडीने मार्गी लागला असता, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. शैक्षणिक सुविधांच्या उभारणीत कोणताही विलंब होऊ नये आणि विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.

          पालकांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे सुविधा मिळणे आवश्यक आहे. वर्गखोल्यांचे बांधकाम लांबणीवर पडल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून निधी उपलब्ध करून द्यावा आणि बांधकामास त्वरित प्रारंभ करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

     दरम्यान, शाळेच्या विकासासाठी जाहीर करण्यात आलेले प्रकल्प वेळेत पूर्ण झाले, तर मोरगावसह परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा दीर्घकालीन लाभ होणार आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

To Top