आज मोढवे येथील मरी माता उत्सव; धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण

Staryug.live

आज मोढवे येथील मरी माता उत्सव; धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरण

स्टारयुग लाईव्ह. :     मोरगाव 

बारामती तालुक्यातील मोढवे येथील प्राचीन स्वयंभू मरीआई (मरी माता) देवीच्या वार्षिक उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला असून, ३१ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. देवीची महापूजा, त्रिशूळाची सवाद मिरवणूक तसेच पारंपरिक धार्मिक विधी हे या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असणार आहे.
मोडवे येथील मरीआई देवीचे देवस्थान हे परिसरातील प्राचीन व प्रसिद्ध श्रद्धास्थान मानले जाते. श्री मयुरेश्वर मंदिरापासून सुमारे ८ किलोमीटर, तर सोमेश्वर मंदिरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर नीरा–मोरगाव मार्गालगत हे देवस्थान वसलेले आहे. या देवस्थानाची सेवा परंपरेने मोरे घराण्याकडून केली जाते. प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, अमावस्या आणि पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
वार्षिक उत्सवानिमित्त महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक मोडवे येथे दाखल होत असतात. आजपासून सुरू झालेल्या उत्सवादरम्यान देवीची महापूजा, त्रिशूळाची सवाद मिरवणूक, हस्कोबा मंदिर व त्यानंतर नाथ मंदिर येथे पारंपरिक धार्मिक विधी पार पडणार आहेत. त्यानंतर गावाला अभय देण्याच्या पारंपरिक विधीने उत्सवाची सांगता होणार आहे.
सध्या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचे काम प्रगतिपथावर असून, हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी भाविकांनी उदार हस्ते सहकार्य करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे. तसेच उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधा व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे सचिव हनुमंतराव मोरे यांनी दिली.
यंदाचा मरी माता उत्सव धार्मिक परंपरा, भक्तीभाव आणि सामाजिक ऐक्य जपत मोठ्या उत्साहात साजरा होत असून, परिसरातील तसेच परराज्यातील भाविकांची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे. उत्सवामुळे मोढवे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
To Top