मोरगाव बस स्थानकाच्या प्रसाधनगृहाला पुन्हा लागले खोडसाळपणाचे ग्रहण
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
तीर्थक्षेत्र मोरगाव येथे बस स्थानकाच्या आवारात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून केलेल्या प्रसाधनगृहाला पुन्हा एकदा खोडसाळपणाचे ग्रहण लागल्यामुळे सध्या प्रसाधन गृह बंद असून प्रवासी व भाविक यांची मोठी गैरसोय होत आहे.
वास्तविक, गेली अनेक वर्ष येथे प्रसाधन गृह नसल्यामुळे येणारे प्रवासी व भाविक यांची मोठी गैरसोय होत होती. पूर्वी निधी या बाबी पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते मात्र त्याचीही दुरावस्था झाल्यामुळे काटेरी झुडपांच्या आडोशाचा प्रवाशांकडून लघुशंकेसाठी वापर होत होता.
मोरगाव ग्रामपंचायतने वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमातून येथे सहा लाख रुपये निधीला ग्रामनिधीची जोड लावत येथे प्रसाधन गृह उभारण्यात आले. मात्र, वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणचे दरवाजे तोडणे, वॉश बेसिन फोडणे, नळ काढून घेऊन जाणे असे प्रकार सातत्याने होत होते. गतवर्षी पासून हे प्रसाधनगृह ग्रामपंचायत ने एसटी महामंडळाकडे हस्तांतर केले आहे. यापूर्वी तीन ते चार वेळा एसटी महामंडळाने अज्ञात व्यक्तीकडून झालेल्या खोडसाळपणाकडे दुर्लक्ष करून केलेल्या नुकसानीची डागडूजी केली होती.
नुकताच या ठिकाणी बस स्थानकाच्या आवारात सीसीटीव्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बसविण्यात आले आहेत. ग्रामपंचायतकडून वास्तविक येथे कोणत्या सुविधा नाहीत. एसटी महामंडळाने घेतलेल्या कुपनलिकेच्या आधारावर येथे पाण्याची सोय आहे तर विजेची सोय एसटी महामंडळाने केली आहे.
प्रसाधनगृहाचे आत मधील दरवाजे व नळ तोडल्यामुळे येथे प्रसाधनगृहाचा वापर करण्यास अडथळा येत आहे.
त्यामुळे सध्या गेली 15 दिवसांपासून येथील प्रसाधनगृह बंद अवस्थेत आहे.
प्रसाधन गृह बंद असल्यामुळे प्रवासी विशेषता महिला प्रवासी यांची मोठी गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने खोडसाळपणा करत असलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध लावून येथील प्रसाधनगृह नियमित पायाभूत सुविधा म्हणून सुरळीत चालू राहावे यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवासी व भाविक यांच्यामधून होत आहे.
याबद्दल येथील वाहतूक नियंत्रक सचिन मोरे म्हणाले की, यापूर्वी काही वेळा स्वखर्चाने व तर काही वेळा एसटी महामंडळाने अज्ञात व्यक्तीने येथे केलेल्या नुकसानीची डागडूजी करून प्रवाशांची सोय करून दिली आहे. मात्र, स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन यांनीही येथे खोडसाळपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
