मोरगावात युरिया खताच्या कथित काळ्याबाजाराचा आरोप; रात्री ५० पोती गायब झाल्याने खळबळ!‘एका आधार कार्डवर एकच पोते’चा नियम, मग रात्री ट्रॅक्टरमधून ५० पोती कुठे गेले? — शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Staryug.live


मोरगावात युरिया खताच्या कथित काळ्याबाजाराचा आरोप; रात्री ५० पोती गायब झाल्याने खळबळ!
‘एका आधार कार्डवर एकच पोते’चा नियम, मग रात्री ट्रॅक्टरमधून ५० पोती कुठे गेले? — शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

स्टारयुग लाईव्ह : मोरगाव

बारामती तालुक्यातील मोरगाव येथे बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या खत विक्री केंद्रातून युरिया खताचा मोठ्या प्रमाणात कथित काळाबाजार झाल्याचा गंभीर आरोप मोरगाव परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे. १९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास केंद्र चालकाने बेकायदेशीरपणे दुकान उघडून ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुमारे ५० पोती युरिया खत बाहेर नेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात युरिया खत दुकानातून बाहेर नेले जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे याच केंद्रावर शेतकऱ्यांना एका आधार कार्डवर केवळ एकच पोते युरिया देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे खतवाटपाच्या पद्धतीवरच शेतकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दहा टायरच्या ट्रकमधून खत उतरले; एका रात्रीत साठा कुठे गेला?

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित खत विक्री केंद्रावर आदल्या दिवशीच दहा टायरच्या ट्रकमधून मोठ्या प्रमाणात युरिया खत उतरवण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या एका रात्रीत मोठ्या प्रमाणात खताचा साठा बाहेर गेल्याचा आरोप होत असल्याने या केंद्रावर नेमका किती साठा आला, किती खताची विक्री झाली आणि सध्या किती साठा शिल्लक आहे, याची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

‘शेतकऱ्यांना एक पोते, मग ५० पोती कुठे?’
खरीप हंगामात पिकांना वेळेवर युरिया खताची गरज असताना शेतकऱ्यांना खतासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक शेतकरी युरियासाठी कृषी केंद्रांच्या फेऱ्या मारत आहेत. अशा परिस्थितीत एका आधार कार्डवर एकच पोते देण्याचे कारण सांगितले जात असताना रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात खत बाहेर नेले जात असल्याचा आरोप झाल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे.
“शेतकऱ्यांना युरिया मिळत नाही, मात्र रात्रीच्या अंधारात एवढ्या मोठ्या प्रमाणात खत बाहेर कसे जाते?” असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

साठा, विक्री आणि वाहतूक रेकॉर्डची चौकशी करा
संबंधित केंद्रावर आलेल्या युरिया खताचा संपूर्ण साठा, विक्रीच्या पावत्या, शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकावर झालेली विक्री, उपलब्ध शिल्लक साठा तसेच रात्रीच्या वेळी खत वाहून नेण्यात आले असल्यास त्यासंबंधीचे वाहन व वाहतूक रेकॉर्ड यांची बारामती तालुका खरेदी-विक्री संघ आणि तालुका कृषी विभागाने संयुक्तपणे चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

युरिया खताचा साठा व वितरण यामध्ये कोणताही गैरप्रकार झाला आहे का, याचा खुलासा संबंधित प्रशासनाने करावा. शेतकऱ्यांच्या हक्काचे खत नियमबाह्य पद्धतीने वळविले जात असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
केंद्र चालकावर कारवाई होणार का?
युरिया खतासारख्या अत्यावश्यक कृषी निविष्ठेबाबत शेतकऱ्यांना अडचणीत टाकणारा कोणताही प्रकार गंभीर मानला जातो. त्यामुळे मोरगावातील या खत विक्री केंद्राची तातडीने तपासणी करून आलेल्या साठ्यापासून ते झालेल्या विक्रीपर्यंतचा संपूर्ण हिशेब तपासला जाणार का? रात्री दुकान उघडून खत बाहेर नेल्याच्या आरोपाची चौकशी होणार का? आणि दोष आढळल्यास संबंधित केंद्र चालकावर कोणती कारवाई होणार? याकडे संपूर्ण मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ५० पोती युरिया खत रात्री गायब झाल्याचा आरोप हा गंभीर स्वरूपाचा असल्याने संबंधित यंत्रणेने तातडीने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.
To Top