मयुरेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना क्रीडा संस्कारांचा संदेश.
स्टारयुग लाईव्ह. : मोरगाव
श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मोरगाव येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षिका पूनम माने यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
विद्यार्थिनी सिद्धी तावरे व सई खैरे यांनीही क्रीडा दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदवी खैरे व आरुषी नवले यांनी केले.
खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच विविध क्रीडा प्रकारांमध्येही सक्रिय सहभाग घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख रमेश शेवते यांनी केले. विद्यालयातील शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमाची माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख सारिका तांबे यांनी दिली.
