संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगावात दीड लाख भाविकांची गर्दी; श्री मयुरेश्वराचे घेतले दर्शन

Staryug.live

संकष्टी चतुर्थीनिमित्त मोरगावात दीड लाख भाविकांची गर्दी; श्री मयुरेश्वराचे घेतले दर्शन

स्टारयुग लाईव्ह :    मोरगाव 

अष्टविनायकांमधील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथील श्री मयुरेश्वर गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त रविवारी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. दिवसभरात सुमारे दीड लाखांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची माहिती देण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
बारामती–पुणे या प्रमुख मार्गावर असलेल्या श्री मयुरेश्वर मंदिरात दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावेळी संकष्टीचा योग आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी आल्याने नेहमीपेक्षा जवळपास दुप्पट गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात तसेच नवीन मंदिरातील बदलांमुळे रांगा सुरळीतपणे पुढे सरकत होत्या. संपूर्ण दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी वर्दळ कायम होती. राज्य शासनाच्या विविध विकासकामांमुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक व सुस्थितीत दिसून येत आहे.
नेहमीच्या परंपरेनुसार पहाटे मंदिरातील मुख्य पुजारी महेश गाडे यांनी महापूजा केली. त्यानंतर सकाळी सात वाजता सालकरी विजय दत्तात्रय डेरे यांच्या हस्ते पूजा व अभिषेक संपन्न झाला. दुपारी १२ वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने निर्मित करण्यात आलेल्या महापूजा केशरी वाडा यांच्या हस्ते करण्यात आली.
दिवसभर मंदिर परिसर, ग्रामपंचायत हद्द आणि बारामती–पुणे मुख्य मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर भाविकांची मोठी गर्दी होती. बाजारपेठेत हार, दुर्वा, पेढे, फुले आणि पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्येही मोठी खरेदी झाली.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मोफत खिचडी प्रसादाचे वितरण करण्यात आले. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर यांसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाविकांनी मोरगावात येऊन श्री मयुरेश्वराचे दर्शन घेतले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज कुमार नवसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपे पोलिस ठाण्याचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मोरगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सरपंच अलकामाई पोपटराव तावरे यांनी दिली.
ठळक मुद्दे
संकष्टी चतुर्थीनिमित्त सुमारे दीड लाख भाविकांनी घेतले श्री मयुरेश्वराचे दर्शन.
संकष्टीचा योग आणि रविवारची सुट्टी असल्याने नेहमीपेक्षा दुप्पट गर्दी.
पहाटेपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा.
देवस्थान ट्रस्टतर्फे मोफत खिचडी प्रसाद वाटप.
वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त.
ग्रामपंचायतीकडून भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध.
To Top