मोरगावात जय मल्हार क्रांती संघटनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न; राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य उपस्थिती.

Staryug.live


मोरगावात जय मल्हार क्रांती संघटनेची राज्यस्तरीय बैठक उत्साहात संपन्न; राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भव्य उपस्थिती.

स्टारयुग लाईव्ह :    मोरगाव 

बारामती तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोरगाव येथील शिवांकुश मंगल कार्यालयात जय मल्हार क्रांती संघटनेची राज्यस्तरीय बैठक नुकतीच अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघटनेचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे मोरगाव परिसरात संघटनेच्या कार्याचा उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.

बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी अंकुशराव जाधव सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. दोन्ही मान्यवरांनी संघटनेची आगामी वाटचाल, संघटनात्मक बांधणी, सामाजिक कार्याची दिशा, युवकांचा सहभाग आणि राज्यभर संघटनेचे जाळे अधिक बळकट करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून समाजहिताचे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

बैठकीत राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील संघटनेचे उपक्रम, विस्तार योजना, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, समाजातील विविध प्रश्नांवर संघटनेची भूमिका तसेच जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आवश्यक नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील कार्याचा अहवाल मांडत विविध सूचना आणि मतेही व्यक्त केली.
ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यकर्त्यांमधील समन्वय, एकोप्याची भावना आणि संघटनेप्रती असलेली निष्ठा या बैठकीत प्रकर्षाने दिसून आली. उपस्थितांनी संघटनेच्या आगामी वाटचालीसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

या राज्यस्तरीय बैठकीची तयारी मोरगाव परिसरात गेल्या दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू होती. बैठकीसाठी येणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वागतापासून ते संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनापर्यंत सर्व व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती.
या भव्य बैठकीचे आयोजन महेश दादा जाधव यांनी केले होते. तर संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन रवींद्र बापू जाधव यांनी केले. त्यांच्या नियोजनामुळे राज्यभरातून आलेल्या सर्व मान्यवरांची आणि कार्यकर्त्यांची योग्य व्यवस्था करण्यात आली. उपस्थितांनी आयोजकांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.

राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भव्य उपस्थितीमुळे मोरगावातील ही राज्यस्तरीय बैठक जय मल्हार क्रांती संघटनेच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि संस्मरणीय ठरली. आगामी काळात संघटना अधिक जोमाने सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम राबविणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.



To Top