विद्यार्थ्यांनी कायदा पाळा, सायबर सुरक्षितता जपा; व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
मोरगाव येथील श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेविषयक जनजागृती, सायबर सुरक्षा आणि व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. रवींद्र मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदे, सायबर गुन्हे तसेच व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी कमी वयात व परवाना नसताना दुचाकी अथवा अन्य कोणतेही वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक मोहरकर यांनी केले. अल्पवयीन व्यक्तीने वाहन चालविल्यास संबंधित पालक किंवा वाहनमालकावरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. मोटार वाहन अधिनियमातील कलम 199A नुसार पालक किंवा वाहनमालकास तीन वर्षांपर्यंत कारावास तसेच ₹२५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. वाहनाच्या नोंदणीबाबतही कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगत, अनोळखी व्यक्तींचे व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, संशयास्पद ॲप किंवा फाइल डाउनलोड करू नये, तसेच कोणतीही वैयक्तिक अथवा गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असे मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय मोबाईलचा योग्य व मर्यादित वापर करावा, चांगली संगत निवडावी आणि अमली पदार्थांसह कोणत्याही प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
“विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या ऊर्जेचा सकारात्मक आणि विधायक कामासाठी उपयोग झाला पाहिजे. चुकीची संगत व व्यसनांचे आकर्षण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणू शकते,” असा संदेश पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मोहरकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अर्जुन कोकरे तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचा परिचय श्री. प्रवीण आटोळे यांनी करून दिला. विद्यार्थ्यांनीही या मार्गदर्शनपर कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“कायदा पाळा, सायबर सुरक्षित राहा, व्यसनांपासून दूर राहा आणि उज्ज्वल भविष्य घडवा!” हा संदेश या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.
