मयुरेश्वर दर्शन मार्गावरील धोकादायक स्वागत कमान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या जीवाला धोका!

Staryug.live

मयुरेश्वर दर्शन मार्गावरील धोकादायक स्वागत कमान; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांच्या जीवाला धोका!

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव 

अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या श्री क्षेत्र मोरगाव, ता. बारामती येथील मयुरेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या दर्शन मार्गावरील स्वागत कमान सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. कमानीच्या खांबाला मोठमोठे तडे गेले असून स्लॅबचे तुकडे तुटून खाली पडत आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

माजी सैनिक दशरथ महादेव तावरे यांच्या वतीने सन २००५ मध्ये भाविकांच्या स्वागतासाठी ही कमान उभारण्यात आली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ऊन, पाऊस आणि वाऱ्याचा सामना करत ही कमान आता जीर्ण झाली असून तिची तातडीने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

कमान की ‘मृत्यूचा सापळा’?

कमानीच्या खांबांना तडे गेले असून स्लॅबला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. कमानीचे काही भाग तुटून खाली पडत असल्याचेही दिसून येत आहे. विशेषतः या मार्गावर भाविकांची मोठी वर्दळ असते. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच बाहेरगावाहून येणारे भाविक याच मार्गाने मंदिराकडे जात असल्याने एखादा तुकडा अचानक खाली कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज तुकडा पडतोय; उद्या संपूर्ण कमान कोसळण्याची प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

यमराजाची टांगती तलवार’ बनलेली कमान!

मयुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे स्वागत करणारी ही कमान आता स्वागताची नव्हे, तर ‘यमराजाची टांगती तलवार’ बनल्याची संतप्त चर्चा मोरगाव परिसरात सुरू आहे. धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या मोरगावात भाविकांच्या सुरक्षेचा असा गंभीर प्रश्न निर्माण होणे ही बाब प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची आहे.
प्रशासन आणखी किती दिवस दुर्घटनेची वाट पाहणार?
धोकादायक झालेली ही कमान केवळ डागडुजी करून सोडण्याऐवजी तातडीने जमीनदोस्त करून त्याच ठिकाणी सुरक्षित व आकर्षक नवीन स्वागत कमान उभारावी, अशी मागणी मोरगाव परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
भाविकांच्या जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्याने संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून धोकादायक भाग सुरक्षित करावा. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
भाविकांचे स्वागत करणारी कमानच जर त्यांच्या जीवाला धोका ठरत असेल, तर प्रशासनाने आता तरी ‘दुर्लक्ष’ सोडून ठोस कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
To Top