सभापती किरण तावरे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बारामतीत प्रथमच संयुक्त बैठक; वेतन फरकासह प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार?
स्टारयुग लाईव्ह : मोरगाव
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यावर प्रशासनासमोर थेट चर्चा करून तोडगा काढण्यासाठी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांच्या माध्यमातून शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी पंचायत समितीच्या सभागृहात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच अशा स्वरूपाची संवादात्मक संयुक्त बैठक होत असल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन, सेवा व कल्याणाशी संबंधित अनेक प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर केवळ निवेदने देण्याऐवजी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत अधिकारी आणि कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासमोर प्रत्यक्ष चर्चा करून प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत तालुक्यातील सुमारे २४ लाख रुपयांचा प्रलंबित वेतन फरक, राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तके अद्ययावत करणे, कर्मचाऱ्यांचा विमा, मासिक वेतनात होणारी दिरंगाई, तसेच ग्रामपंचायतींकडून कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाबाहेर दिली जाणारी अतिरिक्त कामे, विविध कारणांमुळे कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक आदी प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी हा ग्रामीण प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून, गावपातळीवरील विविध शासकीय योजना व ग्रामपंचायतींचे दैनंदिन कामकाज सुरळीत ठेवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. मात्र, त्याच कर्मचाऱ्यांच्या वेतनातील दिरंगाई, सेवा विषयक नोंदींची अपूर्णता, प्रलंबित भत्ते आणि अतिरिक्त कामांचा प्रश्न सातत्याने चर्चेत राहिला आहे. त्यामुळे या बैठकीत ठोस निर्णय होऊन प्रश्न मार्गी लागावेत, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस पुणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर माने, सभापती किरण तावरे, उपसभापती शुभांगी आगावणे, गटनेते बाबा चोरमले, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक जी. बोरावके, तालुक्यातील सर्व विस्तार अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तसेच पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघाचे संस्थापक सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा घोणे, तालुकाध्यक्ष राहुल तावरे, उपाध्यक्ष शहाबुद्दीन तांबोळी, सचिव भोलेनाथ खोमणे यांच्यासह तालुका कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना मिळणार थेट व्यासपीठ
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपल्या अडचणी थेट संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींसमोर मांडण्याची संधी या बैठकीमुळे मिळणार आहे. त्यामुळे ही बैठक केवळ औपचारिक न राहता प्रत्येक प्रश्नावर चर्चा, संबंधित विभागाची भूमिका आणि त्यावर पुढील कार्यवाही याबाबत स्पष्टता निर्माण करणारी ठरण्याची अपेक्षा आहे.
विशेषतः २४ लाख रुपयांचा वेतन फरक, भविष्य निर्वाह निधी, विमा, सेवा पुस्तके आणि वेतनातील दिरंगाई या प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस भूमिका स्पष्ट होणार का, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमित कामाव्यतिरिक्त दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
बारामतीत प्रथमच ग्रामपंचायत कर्मचारी, अधिकारी, संघटना आणि लोकप्रतिनिधी यांना एका व्यासपीठावर आणून प्रश्नांवर थेट संवाद साधला जात असल्याने या बैठकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाचे लक्ष लागले आहे. कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रश्नांना या बैठकीच्या माध्यमातून ठोस दिशा मिळेल, असा विश्वास कर्मचारी वर्गातून व्यक्त होत असून, बैठकीपूर्वीच कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
