सीए अबोली भापकर हिचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार
..स्टारयुग लाईव्ह: मोरगाव
मोरगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. सीए परीक्षेत यश मिळविलेली
तरडोली येथील श्री मयुरेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी सीए अबोली संगीता हनुमंत भापकर हिचा सत्कार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
अबोलीने सीए अभ्यासक्रमाचा प्रवास सुरू केल्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात अबोलीला हे क्षेत्र कसे निवडले, कोण मार्गदर्शन करतं, काही अडचण आली तर मला थेट फोन कर म्हणून अतिशय आपुलकीने जिव्हाळ्याने विचारपूस केली होती.
सीए झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अबोलीचे फोनवरून अभिनंदन केले होते.
सुनेत्रा पवार यांच्याकडून सन्मान स्वीकारताना अगदी दादांच्याच स्टाईल मध्ये सुनेत्रा पवार यांनीही त्याच आपुलकीने केलेली चौकशी व ग्रामीण भागात शिक्षण घेऊन सीए झाल्याचे कौतुक करताना दादांच्या आठवणीने व करिअरच्या सुरुवातीलाच त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनाची आठवण अबोलीने सांगितल्यामुळे उपस्थित सर्वजण भावूक झाले होते. यावेळी श्री मयुरेश्वर विद्यालयाचा विद्यार्थी सक्षम सचिन यादव याची राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचाही सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
शिष्यवृत्तीमध्ये गुणवत्ता यादीत चमकलेल्या इयत्ता आठवीतील सई सदाशिव खैरे व आरुषी गोरख नवले या विद्यार्थिनींचा सत्कारही पवार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या रोहिणी संदीप कदम (ढोले) यांनी शिक्षण व गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
