----------------------
मोरगाव : स्टारयुग लाईव्ह
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर मंदिर येथे विराजमान असलेल्या शंभू महादेवाच्या दर्शनासाठी पुणे जिल्ह्यातील मानाची कावड मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रस्थान करताना दिसून आली. अवघड आणि खडतर अशा मुंगी घाटाची चढण पार करत शेकडो भाविकांनी “हर हर महादेव”च्या जयघोषात मंदिराकडे वाटचाल केली.
पुणे जिल्ह्यातील विविध गावांमधून निघालेल्या या मानाच्या कावडीने पहाटेपासूनच मुंगी घाट चढण्यास सुरुवात केली होती. डोंगराळ आणि खडतर मार्ग असूनही भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला दिसला नाही. भगवे झेंडे हातात घेतलेले कावडधारी, डोक्यावर कावड आणि ओठांवर महादेवाचे नामस्मरण, यामुळे संपूर्ण घाट परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
या यात्रेत तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. एकमेकांना आधार देत, शिस्तबद्ध रांगेतून कावड पुढे सरकत होती. अनेक भक्तांनी ही यात्रा केवळ धार्मिक परंपरा नसून आत्मिक समाधान देणारी असल्याची भावना व्यक्त केली.
मुंगी घाट पार केल्यानंतर आता ही मानाची कावड शंभू महादेव मंदिर येथे दर्शनासाठी पोहोचणार असून, महादेवाच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी भाविक आतुर झाले आहेत.
शिखर शिंगणापूरची यात्रा ही श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. दरवर्षी हजारो भाविक या यात्रेत सहभागी होत असतात, आणि यंदाही त्याला अपवाद ठरलेला नाही.
