स्टारयुग लाईव : मोरगाव
अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध असलेल्या श्री मयुरेश्वर गणपती मंदिर, श्री चिंतामणी गणपती मंदिर आणि श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर या गणपती मंदिरांमध्ये विकास कामे व संवर्धनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दर्शनासाठी तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहा मे ते ९ जून या कालावधीत ही तीनही मंदिरे सर्वसामान्य भाविकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये मंदिर परिसराचे सुशोभीकरण, दगडी बांधकाम दुरुस्ती, विद्युत व्यवस्था अद्ययावत करणे, भाविकांसाठी सुविधा वाढविणे, सुरक्षा उपाययोजना तसेच स्वच्छता व संवर्धनाची कामे करण्यात येणार आहेत. वाढत्या भाविक संख्येचा विचार करून मंदिर परिसर अधिक सुरक्षित व सुविधायुक्त करण्यासाठी ही कामे हाती घेण्यात आली आहेत.
या कालावधीत मंदिर परिसरात बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री आणि दुरुस्तीची कामे सुरू राहणार असल्याने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मंदिर बंद राहणार असल्याने राज्यभरातील तसेच बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या भाविकांनी आपल्या यात्रा नियोजनात बदल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अष्टविनायक यात्रेमधील ही तीन प्रमुख स्थळे असल्याने दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. विशेषतः शनिवार, रविवार आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे विकासकामे सुरळीत आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कामे पूर्ण झाल्यानंतर १० जूनपासून मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात येणार असून नव्या सुविधांसह अधिक आकर्षक आणि सुरक्षित वातावरणात भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. मंदिर प्रशासनाने भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
