वारंवार तक्रारी, तरीही उपाय शून्य; मोरगावच्या श्री मयुरेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे!
स्टार युग लाईव्ह :मोरगाव
बारामती–जेजुरी राज्य मार्ग क्रमांक ६५ लगत असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री मयुरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि सुरक्षेबाबतच्या उदासीन भूमिकेमुळे विद्यार्थ्यांची सुरक्षा अक्षरशः रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून राज्य महामार्ग जात असल्याने सकाळी व दुपारी विद्यार्थी ये-जा करताना मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना अपुऱ्या असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांनी व पालकांनी अनेक वेळा शाळा प्रशासनाकडे लेखी तसेच तोंडी तक्रारी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयात निष्काळजीपणा का केला जात आहे, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
एखादी दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त प्रश्न पालक आणि ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियंत्रण, सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था, आवश्यक सुरक्षारक्षकांची नियुक्ती आणि इतर प्रभावी उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवाशी संबंधित हा अत्यंत गंभीर प्रश्न असून, कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी शाळा प्रशासन, संबंधित शासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी पालक, ग्रामस्थ आणि नागरिकांकडून केली जात आहे.
