पावसाने उघडीप दिल्याने बारामतीच्या पश्चिम भागात खरीप पेरणीला वेग
बैलजोडीपासून अत्याधुनिक ट्रॅक्टरपर्यंत विविध साधनांचा वापर; शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर आता पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामाला वेग दिला आहे. शेतशिवारात सर्वत्र लगबग सुरू असून बळीराजा पारंपरिक बैलजोडीसह अत्याधुनिक ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करत असल्याचे उत्साहवर्धक चित्र पाहायला मिळत आहे.
पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकरी वेळेचा सदुपयोग करत दिवसभर शेतात राबताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साहाय्याने तर काही ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून पेरणीची कामे वेगाने सुरू आहेत.
सध्या या भागात बाजरी, मूग, मका, भुईमूग, हळवी कांदा आदी पिकांच्या पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. हवामान अनुकूल राहिल्यास यंदाच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. शेतशिवारात सर्वत्र सुरू असलेल्या पेरणीच्या कामामुळे ग्रामीण भागात पुन्हा एकदा कृषी हालचालींना वेग आला असून, प्रत्येक शेतात पेरणीची लगबग दिसून येत आहे.
योग्य वेळी झालेला पाऊस आणि त्यानंतर मिळालेली उघडीप यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून यंदाचा खरीप हंगाम भरघोस होईल, अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.
