बारामतीच्या पश्चिम भागात 'धूम स्टाईल'चा कहर; अल्पवयीन सुसाट, प्रशासन सुस्त.
स्टारयुग लाईव : मोरगाव
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक शाळांमध्ये अल्पवयीन विद्यार्थी सर्रास दुचाकी चालवत शाळेत येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. वाहन चालविण्याचे कायदेशीर वय पूर्ण झालेले नसतानाही अनेक पालक स्वतःच्या पाल्यांच्या हातात दुचाकीची चावी देत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळा सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत अनेक विद्यार्थी भरधाव वेगाने, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत तसेच 'धूम स्टाईल'ने दुचाकी चालवत असल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे केवळ त्या विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर इतर वाहनचालक, पादचारी आणि शाळकरी विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात येत आहे.
गेल्या काही काळात अल्पवयीन वाहनचालकांच्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. तरीही या प्रकारावर प्रभावी नियंत्रण दिसून येत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यास परवानगी देणाऱ्या पालकांवर तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शाळांबाहेर विशेष तपासणी मोहीम राबवून अल्पवयीन वाहनचालकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या प्रकाराकडे संबंधित शाळा, पालक आणि पोलीस प्रशासन यांनी गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आजच कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
