धोकादायक इमारतीत भरतेय विद्यार्थ्यांची शाळा; सोमेश्वर विद्यालय, आंबी बुद्रुकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष?

Staryug.live

धोकादायक इमारतीत भरतेय विद्यार्थ्यांची शाळा; सोमेश्वर विद्यालय, आंबी बुद्रुकच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष?

स्टारयुग लाईव्ह :    मोरगाव 

बारामती तालुक्यातील आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाची इमारत सध्या धोकादायक अवस्थेत आहे .विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इमारतीच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले आहेत, अनेक ठिकाणी फरशी खचली आहे, तर काही वर्गांमध्ये भिंतींना एवढ्या मोठ्या भेगा पडल्या आहेत की एका वर्गातून दुसऱ्या वर्गातील दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.


    शाळेच्या इमारतीतील अनेक वर्गांच्या छतावरील (स्लॅब) प्लास्टर गळत असून काही ठिकाणी स्लॅबचे तुकडे थेट वर्गात पडत असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळ्यात छतामधून पाणी झिरपत असल्याने स्लॅब अधिक कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे वर्ग नियमितपणे सुरू असल्याने कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    स्थानिकांच्या मते, इमारतीची अवस्था अत्यंत गंभीर असून आजपर्यंत अधिकृत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. इमारत वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याचा कोणताही अधिकृत अहवाल उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याचा आरोप  आहे.
विशेष म्हणजे, सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इतर शाखांमधील शाळांच्या इमारतींची दुरुस्ती व डागडुजी करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र आंबी बुद्रुक येथील शाखेकडे अद्यापही दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ व पालकांकडून केला जात आहे. इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी, प्रस्ताव किंवा प्रशासकीय प्रक्रिया नेमकी कोणत्या टप्प्यावर आहे, याबाबतही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
पालकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून तज्ज्ञांकडून अहवाल घ्यावा, आवश्यक असल्यास धोकादायक वर्ग त्वरित बंद करावेत आणि नवीन इमारत किंवा तात्पुरती पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
दरम्यान, ग्रामस्थांनीही संबंधित शिक्षण संस्था, शिक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. "एखादी दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती टाळण्यासाठी आताच पावले उचलली पाहिजेत," अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

स्टार युग लाईव्ह चे प्रमुख प्रश्न

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट अद्याप का करण्यात आले नाही?
भिंतींना तडे, खचलेली फरशी आणि गळणारे स्लॅब असूनही वर्ग सुरू का आहेत?
इतर शाखांची दुरुस्ती झाली, मात्र आंबी बुद्रुक शाखेकडे दुर्लक्ष का?
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कोणाची?
एखादी दुर्घटना घडल्यास त्याची कोण घेणार
To Top