मोरगाव परिसरात युरियाची कृत्रिम टंचाई?‘मागडी’ खते घेतल्याशिवाय युरिया नाही; खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

Staryug.live

मोरगाव परिसरात युरियाची कृत्रिम टंचाई?
‘मागडी’ खते घेतल्याशिवाय युरिया नाही; खरीप हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक

स्टारयुग लाईव्ह  :  मोरगाव 

बारामती तालुक्यातील मोरगाव परिसरात खरीप हंगाम जोमात सुरू असतानाच युरिया खताच्या उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही कृषी केंद्र चालकांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार युरिया खत देण्याऐवजी, युरियासोबत इतर ‘मागडी’ खते किंवा कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खरीप पिकांना वेळेवर खत देण्यासाठी धावपळ करणाऱ्या शेतकऱ्यांना नाईलाजाने अतिरिक्त खते खरेदी करावी लागत असल्याचे चित्र आहे.

युरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती?

मोरगाव परिसरातील काही कृषी केंद्रांवर युरिया खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना थेट युरिया देण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. ‘युरिया हवा असेल तर आधी अमुक खत घ्या’, अशा प्रकारची अट घातली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खरीप हंगामातील पिकांना योग्य वेळी युरिया देणे आवश्यक असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे शेतीचा वाढता खर्च, मजुरी आणि इतर निविष्ठांचे वाढलेले दर, तर दुसरीकडे खत खरेदीसाठी लादल्या जाणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढत आहेत.

कृषी विभागाच्या कारवाईकडे लक्ष

युरिया खताची उपलब्धता, साठा आणि विक्री याबाबत संबंधित कृषी विभागाने मोरगाव परिसरातील कृषी केंद्रांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. खताचा साठा, विक्रीची पावती, शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारे दर तसेच युरियासोबत इतर उत्पादने घेण्याची सक्ती केली जाते का, याची चौकशी करण्याची गरज आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी वणवण करावी लागत असेल आणि उपलब्ध खतासाठी अतिरिक्त खते खरेदी करण्याची सक्ती होत असेल, तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. संबंधित विभागाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष कृषी केंद्रांवर जाऊन परिस्थितीची तपासणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर तसेच सक्तीने जोडखत विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार का? याकडे आता मोरगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
To Top