भर चौकात पेट्रोलची मोटारसायकल पेटवली; बारामतीत नागरिकांच्या जीवितास धोका
सुभाष चौकातील थरारक प्रकार; पोलिसांची तत्पर कारवाई, अग्निशामक दलाच्या मदतीने आग आटोक्यात
बारामती | स्टारयुग लाईव्ह
बारामती शहरातील वर्दळीच्या सुभाष चौक मार्केट परिसरात भर रस्त्यावर पेट्रोल असलेली स्वतःची मोटारसायकल पेटवून नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोका निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. १०) सकाळी घडला. या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित इसमाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यात सुभाष चौक येथे एका व्यक्तीने भर चौकात मोटारसायकल पेटवून दिल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले असता सुभाष चौकातील सार्वजनिक रस्त्यावर हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH13Q0673) मोठ्या प्रमाणावर पेटलेली आढळून आली. मोटारसायकलमधून आगीच्या मोठ्या ज्वाळा व धूर निघत होता. चौकात दुकाने, व्यावसायिक आस्थापना तसेच नागरिक आणि वाहनांची मोठी वर्दळ असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.
पोलिसांनी मोटारसायकळीजवळील व्यक्तीची चौकशी केली असता त्याने आपले नाव गणेश विठ्ठल माने (वय ३९, रा. कैकाडगल्ली, बुरुडगल्ली रोड, बारामती) असे सांगितले. पेटलेली मोटारसायकल स्वतःच्या मालकीची असल्याचेही त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पेट्रोलमुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता
प्राथमिक तपासानुसार, नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असताना सार्वजनिक रस्त्यावर पेट्रोल असलेली मोटारसायकल पेटविण्यात आल्याने आग आणखी भडकण्याचा तसेच पेट्रोलच्या टाकीमुळे गंभीर दुर्घटना घडण्याचा धोका निर्माण झाला होता. आग जवळील वाहने, दुकाने अथवा इमारतींपर्यंत पोहोचल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता होती.
पेटलेली मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दुकानदार, पादचारी, वाहनचालक आणि परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली.
हातात पेटती सिगारेट घेऊन आरडाओरड
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इसम पेटलेल्या मोटारसायकलीपासून दूर जाण्याऐवजी तिच्याभोवती फिरत होता. त्याच्या हातात पेटती सिगारेट असून तो मोठमोठ्याने आरडाओरड करीत असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती शहर पोलिसांनी संबंधित इसमाला तात्काळ ताब्यात घेतले. त्यानंतर अग्निशामक दलाशी संपर्क साधण्यात आला. अग्निशामक दलाच्या मदतीने पेटलेल्या मोटारसायकलची आग विझविण्यात आली. पोलिस आणि अग्निशामक दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग जवळील वाहने, दुकाने किंवा इमारतींपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात आली.
कोणतीही मोठी हानी टळली
या घटनेत अन्य वाहन, दुकान अथवा इमारतीचे नुकसान झाले नसल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. मात्र, वर्दळीच्या बाजारपेठेत पेट्रोल असलेली मोटारसायकल पेटविल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांच्या वेळीच झालेल्या कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला.
या प्रकरणी पोलीस शिपाई विशाल गोरख चौधर, ब.नं. १५८८ यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. ३२३/२०२६ नुसार आरोपी गणेश विठ्ठल माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५, २९२, २८७ व ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा मपोहेवा डिसले, ब.नं. १५३७ यांनी दाखल केला असून, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेवा लोंढे, ब.नं. १९६३ करीत आहेत.
बारामती शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन करताना, सार्वजनिक ठिकाणी धोकादायक प्रकार घडत असल्यास नागरिकांनी स्वतः हस्तक्षेप न करता तातडीने पोलिस अथवा आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क साधावा आणि गर्दी न करता यंत्रणांना सहकार्य करावे, असे सांगितले आहे.
